अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलीस व्हॅन आणि दुचाकीमध्ये आज सकाळी धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पोलीस व्हॅनमधूनच दाखल करण्यात आले. विनायक मुरूमकार यांचा या अपघातात मृत्यू झाला असून योगेश मांगटे पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा - आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर
विनायक मुरुमकार व योगेश मांगटे पाटील हे दोघे दुचाकीने (एमएच - 30 - एआर - 506) शिवणी येथील आपल्या गावी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची दुचाकी पोलीस व्हॅनवर आदळली. या अपघातात विनायक मुरुमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर, योगेश मांगटे पाटील हेही गंभीर जखमी झाले.
या दोघांना त्याच पोलीस व्हॅनने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विनायक मुरुमकार यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली. या घटनेनंतर घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस करत आहे.