अकोला - शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या विझोरा येथील तलाठ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ अटक केली. हिंमत रामभाऊ मानकर असे आरोपीचे नाव असून पीक कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.
तक्रारदाराला पीक कर्जासाठी लागणारा ७/१२, नमुना ८ चा उतारा देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली हिमंत मानकर याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली. तकारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने याप्रकरणी 15 मे रोजी पडताळणी केली होती. तलाठी मानकर याने तक्रारदारास गोरक्षण रोडवरील अंबिकानगरमधील तुळजाभवानी अॅटो मोबाईल अँड स्पेअर पार्टस रिपेअरिंग सेंटरच्या शेडमध्ये बोलाविले. त्याठिकाणी एसीबीने सापळा रचला होता. तलाठी मानकर याने पैसे घेतल्यानंतर एसीबीने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपाधीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी केली.