अकोला - शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. अकोला शहराचे आजचे कमाल 45.6 आणि किमान 29.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल (सोमवारी) 45.3 अंश तर रविवारी 45.7 अंश तापमान होते. गेल्या 3 दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
शहरात 2 ते 3 अंश तापमान वाढले असून या आठवड्यातील 45.7 अंश हे या वर्षातील उच्चांकी तापमान आहे. रविवारी या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानात चढ-उतार होत असली तरी उष्णता कायम आहे. त्यामुळे 'हिटवेव्ह'चा परिणाम आणखी काही दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
त्याबरोबरच मान्सून लांबला असून 17 जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत उन्हाचे चटके आणि तापमानातील चढउतार अकोलेकरांना सहन करावे लागणार आहे.