अकोला - प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी (बीजी 3) व बीटी वांग्यांची लागवड केल्याप्रकरणी तब्बल 12 जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे.
‘माझं वावर-माझी पॉवर’ या शेतीपयोगी तंत्रज्ञान स्वातंत्र्याकरिता शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले. या आंदोलनाला शेतकरी संघटनेने पाठिंबा देत एचटीबीटी बियाणे पेरणीचे तीन प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यानंतर 24 जूनला एचटीबीटी कापूस वाणाची पेरणी व बीटी वांग्याचे रोप टाकण्याचा चौथा प्रयोग करण्यात आला. एचटीबीटी बियाण्यांना मान्यता नसल्याने या बियाण्यांची लागवड करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानंतरही शेतकरी संघटनेने व शेतकऱयांनी एकत्र येत एचटीबीटी कपाशीची लागवड केली.
याप्रकरणी तेल्हारा तालुक्याचे कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत सुधाकर बहाळे यांच्यासह लक्ष्मीकांत कौठकर, सिमा नराळे, प्रमिला भारसाकळे, प्रज्ज्वल बदरखे, निलेश नेमाडे, विक्रांत बोंद्रे, सतिष सरोदे, अमोल मसुरकार, गोपाल निमकर्डे, मोहन खिरोडकर व दिनेश गिऱहे यांच्याविरुद्ध भांदवि च्या कलम 420, 143, 186, 188 तसेच पर्यावरण संरक्षक कायदा 1986 च्या कलम 7, 8, 11, 14 आणि बियाणे कायदा 1966 च्या कलम 7, एबीसीडी 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ पवार करीत आहेत.