अकोला - कोरोना विषाणूची लढाई सर्वच स्तरावर लढल्या जात आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या नावाप्रमाणेच समर्पण दाखवून नवा आदर्श निर्माण केला आहे. सायकल घेण्यासाठी जमा केलेल्या खाऊच्या २ हजार ५४० रुपयांची मदत सरकारला केली. इतक्या लहान त्याने वयात मोठ्या व्यक्तींसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अकोला पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक संदीप वानखेडे यांचा मुलगा समर्पण वानखेडेचा 21 एप्रिलला 12 वा वाढदिवस होता. सायकल घेण्यासाठी खाऊचे पैसे जमा केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून सायकल घेण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने खाऊचे पैसेही दुसऱ्या कोणत्याच खर्चासाठी खर्च केले नाही. चॉकलेट किंवा इतर खेळणे घेण्यासाठी त्याने खाऊचे पैसे खर्च केले नाही. या पैशांतून त्याला फक्त सायकल घ्यायची होती. तो २१ एप्रिलला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल घेणार होता. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे सर्व दुकाने बंद आहेत. त्यात सरकारकडून मदतीसाठी आवाहन केले जात आहे. त्यामुळे त्याने अनेक दिवसांपासून जमा केलेले खाऊचे पैसे शासनाला मदतीसाठी देऊन आपले कर्तव्य पार पडू, असे ठरवले. त्याने सायकल घेण्याऐवजी जमा केलेले २ हजार ५४० रुपये रक्कम सरकारला मदत म्हणून दिली. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांंना ते पैसे सुपूर्द केले. 'समर्पण'चे देशाच्या संकट काळात मदत पाहून पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याचे कौतुक केले.