अहमदनगर - पोलीस चौकीसमोर जाळून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही पीडितेने केला आहे.
रमजान ईदच्या दिवशी श्रीरामपूर येथील दत्तनगर पोलीस चौकी समोर नदीम पठाणने जाळून घेतले होते. या विवाहित तरुणाची प्रवरा रुग्णालयात मृत्यूशी चाललेली झुंज अखेर संपली असून उपचारादरम्यान 28 मेच्या सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नदीमचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत मृत नदीमची आई रशिदा पठाण यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूमागे दत्तनगर येथील पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेल्या दुधाडे नावाचे पोलीस कर्मचारी जवाबदार असून मागील 1 ते दीड वर्षांपासून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून नदीमने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत पोलीस कर्मचारी दुधाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत नदीमचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नदीमच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.