अहमदनगर - शिर्डीच्या सावलीविहिर फाट्याजवळील ११ एकर जागेत जागतिक विश्व विक्रमाची रांगोळी काढण्याचा निश्चय कोपरगावच्या सौंदर्या संदीप बनसोड हिने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ती हा विश्वविक्रम करणार आहे. त्यासाठी सौंदर्याने तयारी सुरू केली आहे.
सौंदर्याला ही विश्व विक्रमाची रांगोळी काढण्यासाठी अंदाजे २५० टन अर्थात २५ लाख रुपयांची रांगोळी लागणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारणार आहे. एवढी मोठी रांगोळी काढण्याचा विक्रम १२ वर्षाची सौंदर्या बनसोड करणार आहे.
सौंदर्या ही १२ वर्षांची असून ती ७ व्या वर्गात शिकत आहे. सौंदर्याचे वडील संदिप बनसोड संगणक विक्री आणि दुरूस्तीचा व्यवसाय करतात. संदिप यांना २ मुली आहेत. परिस्थिती जेमतेम असताना भव्य रांगोळी साकारण्याचे मुलीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी संदिप यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. ११ एकरात रांगोळी साकारण्यासाठीचा खर्च तब्बल ४० लाख रुपये आहे. यासाठी त्यांनी कर्ज काढले, तर आई मिनाने आपले सोन्याचे दागिने मोडून मिळालेली रक्कम मुलीच्या स्वप्नासाठी खर्च केली आहे. मुलीचा हट्ट आणि तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी संदिप बनसोड यांनी हा धाडसी निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
या छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती सौंदर्या साकारत आहे. जवळपास २० दिवस अथक परीश्रम करून ती रांगोळी साकारणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी ती विश्वविक्रमाला गवसनी घालणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाल वयातच स्वराज्य स्थापनेचा प्रण केला, त्यांच्या विचारांनी प्रेरीत होवून सौंदर्याने शिवाजी महाराजांची भव्यदिव्य रांगोळीचा काढण्याचा निर्धार केला आहे. २६ जानेवारीपासून ती दररोज सकाळी ८ वाजल्यापासून दिवस मावळेपर्यंत हे काम करते. दरम्यान दुपारी १ तास जेवण आणि त्याच वेळेत थोडासा खेळ असा छोटासा ब्रेक घेते.
सौंदर्याच्या या कामासाठी तिचे आई वडील तिला मदत करत आहेत. रांगोळीचा आजवरचा जागतिक रेकॉर्ड ४ लाख स्केअर फुटाच्या सामुहीक रांगोळीचा आहे. सौंदर्या काढत असलेली छत्रपतींची रांगोळी तब्बल साडेचार लाख स्केअर फुटाची असणार आहे.