अहमदनगर - नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने चालू आहे. मात्र, या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम काही काळासाठी बंद पाडले. यासाठी मंगळवारी ग्रामसभा घेण्यात आली, यात कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्यानंतर काम पुन्हा सुरु करण्यात आले.
हेही वाचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'
नागपूर ते मुंबई या प्रस्तावीत महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. मात्र ते करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम करताना मालवाहतूक गाड्यांची ये-जा होते, यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ निर्माण होत आहे. याचा विपरीत परिणाम शेतीवर होतो. याच कारणांमुळे संतप्त झालेल्या कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. रस्त्यावर पाणी न मारल्याने पिकावर धूळ बसत आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या गोदावरी नदीपासून आणलेल्या सिंचनासाठीच्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत. तेव्हा अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले. त्यानंतर मंगळवारी कोकमठाण गावात कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत, जो पर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही. तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
हेही वाचा... 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. मात्र, हे काम होत असताना कोणतीही विशेष काळजी कंपनीकडून घेतली जात नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवजड वाहतूक करणारे वाहने रस्त्याने जात असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अनेक पाईपलाईन यामुळे फुटत आहे. अनेक वेळा या कंपनीकडे तसेच प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेत नसल्याने, अखेर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होत ग्रामसभा आयोजीत केली होती.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, आरोपी पतीनेही संपवले जीवन
मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत तहसीलदारांनी ग्रामस्थांची मते जाणुन घेतली. तसेच या बैठकीत महामार्गाचे काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत काम करण्याच्या सुचना दिल्या. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला.