अहमदनगर - महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून करजूले हरिया गावाने जलसंधारणासाठी एकजुटीचे दर्शन घडविले आहे. चळवळीचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात एक मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत येथील ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे.
पारनेर तालुक्यातील हे गाव आहे. कर्जुले हरिया याठिकाणी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून महाश्रमदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी फाउंडेशन संस्थेचा मूलमंत्र ठरलेल्या एक जुटीने पेटलं रान, तुफान आलंया...काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलंया या गीताचा प्रत्यय कर्जुले हरिया गावच्या माळराणावर दिसून आला. श्रमदान करण्यासाठी अहमदनगरसह कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, पुणे, मुबंई, पनवेल या ठिकाणाहून शेकडोच्या संख्येने जलमित्र उपस्थित होते. तालुका स्तरावर कर्जुले हरिया हे गाव श्रमदानासाठी अग्रेसर आहे.
जलसंधारणासाठी दिल्या जाणाऱ्या एकूण ३० गुणांपैकी २६ गुण हे या गावाला मिळाले आहेत. त्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्डे, वृक्ष संवर्धन, पाणी संवर्धन, गाव स्वच्छतेचा समावेश आहे. तसेच कर्जुले हरिया या गावाचे एकूण २ लाख ६६ हजार ६६६ एवढे क्षेत्रफळ आहे. मशीनच्या साहय्याने १ लाख ६६ हजार एवढे क्षेत्रावरील काम पूर्ण करण्यात आले आहे. तर श्रमदान करून २ हजार घनमीटर एवढं काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी संपूर्ण तालुक्यातून व राज्यातून जलमित्र उपस्थित होते. या सर्व कामाचा खर्च लोक सहभागातून करण्यात आला. यासाठी मुंबईकर मंडळ, पुणेकर मंडळ, कर्जुले हरियाच्या ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.