शिर्डी (संगमनेर) Vikhe Patil On Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांनी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला विद्यामान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी त्यांनी लोकांवर टीका करणं योग्य नाही. राजकीय संघर्ष माझ्यात तसंच तुमच्यामध्ये आहे. वडीलधाऱ्यांवर टीका करुन तुम्ही काय साध्य करत आहात, असा सवाल विखे पाटील यांनी व्यक्त केलाय.
काँग्रेस पक्षात एकवाक्यता नाही : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मात्र, काही लोक दुर्दैवानं वेगवेगळी विधानं करता आहेत. काँग्रेस नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या पक्षात एकवाक्यता नसल्याचं दिसून येतंय. आगोदर काँग्रेसनं अजेंडा ठरवायला हवा. नंतर पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करायला हवं, असं विखे म्हणाले. हीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची असल्याची टीका विखे यांनी केली आहे.
आरक्षण देण्यास कटिबद्ध : आरक्षणाबाबत शरद पवार अजूनही भूमिका स्पष्ट करत नाहीत. उद्धव ठाकरे देखील काहीच बोलत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये असलेल्यांनी मौन बाळगण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसतं असं टीकास्त्र विखे यांनी विरोधकांवर सोडलंय. आमचं युती सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आरक्षणाशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : राज्यात दिवाळीच्या काळात अवकाळी पाऊस पडत असून, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपल्या सरकारनं घेतली आहे. यापूर्वी सरकारकडं धोरण नव्हतं, त्यावेळी त्यांचे नेते ऑनलाइन होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगवला आहे. राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामा करणार असल्याचं देखील विखे पाटील म्हणाले.
अजित पवारांमुळं युती सरकारला बळ : अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्यात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. तसंच त्यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, राज्यात आता राजकीय भूकंपाची तीव्रता नाहीये. त्यांच्या दौऱ्यामागं राजकीय संबंध जोडणं चुकीचं आहे. अजित पवार हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असल्यानं त्यांच्या येण्याने युती सरकारला बळ मिळालं आहे, असं विखे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुंब्र्यात येण्यापूर्वीच 'पेटलं रान' ; अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले स्वागताचे बॅनर
- Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल