शिर्डी (अहमदनगर) - जोरदार पावसामुळे संगमनेर येथील प्रवरा नदीवरील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पाण्यातून दुचाकी घेऊन जात असलेले दोन जण दुचाकीसह प्रवरा नदीच्या पाण्यात वाहून गेले. यापैकी एक जण सापडला असून दुसरा बेपत्ता आहे.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सुनील चांगदेव आहेर (वय 27) आणि शरद धोंडीबा कोल्हे हे दोघे दुचाकी क्रमांक (एम एच 17 ए एस 6728) वरून रविवारी दुपारी संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून जात होते. यावेळी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्या पाण्यातून त्यांनी दुचाकी घातली असता दुचाकीचे चाक पाण्याच्या प्रवाहामुळे घसरले आणि दोघेही वाहून गेले. यापैकी सुनील आहेर सापडला असून शरद कोल्हे हा तरुण बेपत्ता झाला आहे. महसूल प्रशासन आणि ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत. निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी आणि म्हाळुंगी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
धांदरफळ येथील छोट्या पुलावरून पाणी वाहत असूनही काही नागरिक दुचाकीने जात आपला जीव धोक्यात घालत आहेत. निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडल्याने प्रवरा नदीवरील सर्वच छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. एका गावातून दुसऱ्या गावात जाणारे नागरिक या पुलावरून जात असल्याने पोलीस प्रशासनाने येथे बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिक करत आहे.