शिर्डी - जिल्ह्यातील अकोले येथे मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. पिचडांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. हे आंदोलन आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या वेळी पिचडांनी आदिवासींची जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, वैभव पिचड यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. ते उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज झालेले आंदोलन आणि भ्रष्टाचाराची चौकशी मागे लागू नये यासाठीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अकोले तालुका आदिवासी कृती समितीच्यावतीने आदिवासी दाखल्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज अकोलेत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मधुकर पिचड यांनी आपल्या बिगर आदिवासी पत्नीच्या नावे बनावट आदिवासी प्रमाणपत्र काढून शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गातून जाणाऱ्या गरीब आदिवासीं शेतकऱ्यांच्या जमिनी या काडिमोड भावाने घेऊन त्यांची फसवणूक केली. तसेच या जमिनी आपल्या नावे करण्यासाठी परिसरातील महसूल यंत्रणेवर माजी आदिवासी मंत्री असल्याचा दबाव टाकून तेथील प्रांत यांच्या संगनमताने या जमिनी आपल्या नावे केल्या व गरीब आदिवासींना भिकेला लावल्याया आरोप अशोक भांगरे यांनी केला आहे. बनावट आदिवासी प्रमाणपत्राचा वापर करुन हा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिकादेखील दाखल केली असल्याचे ते म्हणाले.
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास -
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोलेचे आमदार वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
1980 पासून मधुकर पिचडांनी राजकारणात प्रवेश केला. 80 ते 99 ते काँग्रेसचे आमदार राहीले. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर पिचड हे पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले. 2014 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार म्हणुन विधानसभेत प्रतिनिधित्व केले. सात टर्म सलग आमदारकी केल्यानंतर 2014 ला मधुकर पिचडांनी त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना आमदारकीसाठी उभे केले आणि निवडुनही आणले. त्याचवेळी मधुकर पिचडांनी राजकारणात आता कोणतेही पद नको ,असे म्हटले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंना अकोले मतदारसंघातून लिड मिळाले होते. मात्र, आता वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्यावर आत्तापर्यंत अनेक राजकीय वार झालेत, व्यक्तिगत टीकाही झाली. मात्र, आपला कोणावरही राग नाही. आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांची मोठी साथ मिळाली. मात्र, आता देश बदलला आहे. वातावरण बदलत आहे. विकासाच्या बाजूने जायचे की प्रवाहाच्या विरोधात, हा प्रश्न होता. मात्र, आता आम्ही विकासाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आहे. आता मला राजकारणात काहीही मिळवायचे नाही. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढविणार नाही, असे मधुकर पिचड यांनी स्पष्ट केले आहे. अकोलेच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, मागील पाच वर्षांत फक्त तीन किलोमीटरचा रस्ता करू शकलो. विरोधी पक्षात राहून काम करता येणार नाही, हे यावरून कळले. त्यामुळे पक्ष बदलायचा आहे. मनात प्रचंड वेदना होत आहेत. मात्र, भाजपची कामाची पद्धत आवडली. त्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल, म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे वैभव पिचडांनी स्पष्ट केले. ही भाजप प्रवेशाची कारणे सांगितली जात असली तरी, अकोले तालुक्यातील पिचड विरोधकांनी मात्र, पिचड यांनी मंत्री पदाच्या काळात केलेले भ्रष्टाचार आणि आदिवासी समाजाची बळकावलेली जमीन आपल्याकडेच राहावी तसेच यांची चौकशी होवू नये यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अरोप केला आहे.