कोपरगाव (अहमदनगर) - शहरासह परिसरात सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरशः दैना उडविली असून शहरातील व परिसरातील विविध भागात अनेक नागरिकांचे घराचे पत्रे उडाले काही ठिकाणी झाडे पडली तर काही नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
कोपरगाव शहरातील हनुमाननगर भागात तर राजेंद्र हटकर यांच्या घराचे पत्रे उडून तीन गल्ल्या पार करत 500 फूट लांब दुसऱ्यांच्या घरावर जाऊन पडले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही, अगोदरच कोरोनाचे संकट, त्यात लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि अशा परिस्थिती छतही वादळाने राहिले नसल्याने अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. हनुमाननगर भागातील राजेंद्र बाबूलाल हटकर आणि लक्षण राजू सोनवणे यांच्या घरासह संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.
संकटकाळी स्थानिक प्रतिनिधींची नागरिकांकडे पाठ -
अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळी स्थानिक प्रतिनिधी पाहायला सुद्धा आले नसल्याने नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पंचनाम्यांना सुरुवात -
कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या. त्यानंतर तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी तात्काळ तलाठ्यांना पंचनामे करण्यास सांगितले व शहर तलाठी योगेश तांगडे यांनी हनुमाननगर भागात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - फेसबुक-ट्विटरसह इतर सोशल मीडिया उद्यापासून बंद?