राहता (अहमदनगर) - डाळींब बागांना यावर्षी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात लॉकडाऊनमुळे बाजारमध्ये डाळींबाचे भाव गडगडले आहेत. सध्या डाळींबाला पाच रुपयांपासून ते ६० रुपये किलो प्रमाणे दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रामाणात डाळींब आणि पेरु बागांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या डाळीबा काढणीला आले. मात्र, लवकर झालेला पाऊस आणि त्यात डाळींबावर तेल्याचा मोठा प्रादुर्भाव यामुळे डाळींबावर काळे डाग पडले आहे. यामुळे काळे डाग पडलेल्या डाळींबाला पाच रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बागांवर केलेला खर्चही विक्रीतून निघून येत नसल्याने शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडले आहे.
शिर्डी जवळील राहाता बाजार समीतीत रोज अठरा ते वीस हजार कॅरेट डाळींबाची आवक होते. मात्र, या डाळींबाला मोठी मागणी उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील असते. मात्र, कोरोना आणि पूर परीस्थीतीमुळे तिकडच्या बाजारात उठाव नाही म्हणजेच खरेदी होत नाही. त्यात येत असलेल्या बहुतांशी डाळींब काळ्या डागामुळे खराब झालेला. त्याला भाव मिळत नाही. एरवी शंभर रुपयांच्यावर असलेला भाव काळ्या डागांमुळे पन्नास रुपयांवर अडकला आहे. आवक जास्त आणि मागणी कमी या सुत्राप्रमाणे सध्या मार्केट चालले असल्याचे व्यापारी संतीश शिंदे यांनी सांगितले.