अहमदनगर - सहकार चळवळीचा जिल्हा म्हणून अहमदनगर एकेकाळी प्रसिध्द होता. मात्र तेथे आता नेत्यांसाठी आणि कारखानदारांसाठी लाचारांच्या फौजा तयार झाल्या आहेत. आमच्याकडे कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार रुपये भाव मिळतो. तर इकडे अहमदनगर जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन 1700 ते 2100 रुपये असा दर दिला जातो. याचाच अर्थ नगर जिल्ह्यातील कारखानदार दरोडोखोर आहेत, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
जागर एफ आर पी चा यात्रे अंतर्गत राजु शेट्टी यांनी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शेतकरी मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील आधीचे सरकार शेतकरी विरोधी होते, म्हणूनच त्यांची सत्ता गेली. मात्र आता महागुरु शरद पवारांच्या मार्गर्दर्शनाखालीच्या सरकारने एफआरपी तीन तुकड्यावर नेहून ठेवली असल्याची टीकाही शेट्टी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर यावेळी केली. राज्यात सध्या लोडशेडींग आम्ही सहन करणार नाही, शेतकऱ्यांना किमान आठ तास लाईट देण्याची मागणी ही शेट्टींनी यावेळी केली आहे.