अहमदनगर- कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाख रुपये देण्यात आले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज हा निधी शासनाला देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मागील काही वर्षापासून दुष्काळ हा राज्याच्या पाचवीला पुजला असल्याची परिस्थिती संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षीही भीषण दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामुळे भीषण पाणी आणि चार टंचाईही निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यमंत्री समितीच्या बैठकीत कारखान्यांना दुष्काळ निधी संदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याच्या वतीने गाळप हंगाम २०१८/१९ च्या ऊस गाळपातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देण्यात आली.
यावेळी काळे यांनी एकूण २५ लाख ५९ हजार २३८ रुपये एवढी रक्कम शासनाकडे सुपूर्द केली आहे. जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनीच ही रक्कम दिली असल्याची माहितीही आशुतोष काळे यांनी दिली.