अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी येथील लक्ष्मीकांत बद्रीनारायण फुंदे या शेतकरी कुटुंबातील तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चित्रपट सृष्टीच्या चंदेरी दुनियेत गायक, संगीतकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्याने आदर्श निर्माण केला आहे.
पाथर्डीतील श्री तिलोक जैन विद्यालयात लक्ष्मीकांतचे महाविद्यलयीन शिक्षण झाले. संगीताच्या ओढीने लक्ष्मीकांतने घरच्यांचा विरोध पत्करून पुणे गाठले. पुण्यात संगीत क्षेत्रात प्रभुत्व मिळवल्यानंतर २०१२मध्ये मुंबईला जाऊन त्याने साउंड इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक पाठबळ नसल्याने वेळप्रसंगी आश्रमामध्ये राहून एम.एची पदवी प्राप्त केली. सुरुवातीच्या कालवधीत मिळेल त्या संगीत स्टुडीओमधून रेकॉर्डीस्ट म्हणून त्याने कामाला सुरुवात केली.
चंदेरी दुनियेत एल.के.लक्ष्मीकांत नावाने ओळख -
लक्ष्मीकांतमधील संगीत कौशल्य पाहून अल्पावधीतच त्याला नामांकित स्टुडीओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याने संधीचे सोने करत कला जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आठ वर्षापासून संगीत क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्या लक्ष्मीकांतला चंदेरी दुनियेत 'एल.के.लक्ष्मीकांत' या नावाने ओळखतात.
आतापर्यंत अनेक प्रोजेक्टवर काम -
अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या 'तेरा इंतजार' या हिंदी चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी लक्ष्मीकांतला मिळाली आहे. त्यानंतर लक्ष्मीकांतची संगीत एक्स्प्रेस तुफान वेगाने धावू लागली. तूतक तूतक तूतिया, हम चार, रोमियो अकबर, वाल्टर, रॉ, हमे तुमसे प्यार कितना अशा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या हिंदी चित्रपटांसह झिंगाची गोळी, एक किनारा मिळाला, कृष्णा कृष्णा या मराठी अल्बममधून लक्ष्मीकांत याने संगीत दिग्दर्शन व गायन केले. मोहित चौहान यांनी गायलेले मिठी मिठी गलन, रहनुमा, हर लम्हा, या चित्रपटात मिश्रण अभियंता म्हणून लक्ष्मीकांतने कौशल्य दाखवले. कान्नड, तमिळ, तेलुगु भाषेतील 'एक्स रे' चित्रपटासाठीदेखील त्याने गायन केले आहे.
रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत -
लक्ष्मीकांतने गाजलेल्या 'ओम शांती ओम' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडलेली आहे. 'बाळू मामाच्या नावाने चांग' भल या टीव्ही मालिकेसाठी गीत गायनही केले. त्याने गायक सोनू निगम, श्रेया घोषाल, कनिका कपूर, उदित नारायण, मोहित चौहान, दर्शन रावल, सुनील शेट्टी, सनी लिओनी, क्रिकेट खेळाडू जहीर खान यांच्या सोबत काम केले आहे.
कोरोना जनजागृतीसाठी काम -
नवोदित संगीतकार, गायक, तंत्रज्ञ यांच्यासाठी महाविद्यालयांमध्ये लक्ष्मीकांत विनामूल्य मार्गदर्शन करत आहे. जगभरातील कलाकारांसोबत कोरोनाशी लढताना काय काळजी घावी हे सांगणारे 'फिर से उडना' या जागृती गीतात अनुप सोनी, जय भानू शाली अशा सेलिब्रेटींसोबत गीते गाऊन लक्ष्मीकांतने जनजागृती सुरू ठेवली आहे.