अहमदनगर - अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या टाकळी काझी (ता. नगर) येथील सरकारी आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेने केले आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रात 1 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापूर्वी डॉक्टर तसेच इतर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते. मुख्यद्वारावर कुलूप लावण्यात आले होते. त्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास बसूनदेखील संबंधीत अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. आसपासच्या नागरिकांना विचारपूस केली असता या ठिकाणी डॉक्टर तसेच कर्मचारी कुठल्याही वेळेत ये-जा करत असल्याचे संघटनेने निवदेनात म्हटले आहे.
परिचारिकाही उद्धट बोलत असल्याचा आरोप
जन आधार संघटनेचे पदाधिकारी आल्याचे कळविल्यानंतर साधारण एक तासाने एक परिचारिकाने येऊन आरोग्य केंद्रातील टाळे उघडले. तीन दिवसापूर्वी आरोग्य केंद्रावरही अशीच परिस्थिती होती. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना कळवले असता त्यांनी तेथील परिचारिकेला फोन करुन उपचार करण्यास सांगितले. परिचारिकेची भाषादेखील अत्यंत उद्धटपणाची होती. परिचारिकाही उद्धट बोलून रुग्णांना हुसकावून लावत असल्याचे जन आधार संघटनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सात दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन-
टाकळी काझी येथील शासकीय आरोग्य केंद्र कोणत्या कारणाने बंद ठेवण्यात आले? हे आरोग्य केंद्र बंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण आला असता त्याच्या जिवाचे बरे वाईट झाले असते. मोठा खर्च करुन रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी हे सरकारी आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रात अनुपस्थित राहणाऱ्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेने केली आहे. येत्या सात दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) वासुदेव सोळंके यांना देण्यात आले. यावेळी जन आधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, नगर शहराध्यक्ष शहानवाज शेख, नेवासा उपाध्यक्ष किरण जावळे, सहसचिव संतोष त्र्यंबके, युवा अध्यक्ष मच्छिंद्र गांगर्डे, नगर उपाध्यक्ष सुशील साळवे उपस्थित होते. त्याचबरोबर संपर्कप्रमुख लक्ष्मण शिंदे, गणेश निमसे, वजीर सय्यद, दीपक गुगळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.