अहमदनगर- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असेलेल्या जामाखेड तालुक्यातील चौडी गावाचा उल्लेख करताना, शरद पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान असल्याची टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. पवार हे आपले नातू रोहित पवार यांना अहिल्याबाई होळकर यांच्यापेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
नेमके काय म्हणाले होते पवार?
दोन दिवसांपूर्वीच जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आमदार रोहित पवार ज्या जामखेड-कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघातील चौंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला. पवार यांच्या या वक्तव्यावर राम शिंदे यांनी टीका करताना पवार यांनी आपल्या नातवाला अहिल्यादेवी यांच्यापेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हंटले आहे. हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा अपमान आहे. आपल्या नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही शिंदे यांनी यावेळी म्हटले.
अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक
शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत, राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.