अहमदनगर - दिल्लीतील आप सरकारच्या गैरकारभाराविरोधात भाजपकडून आंदोलनात समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे, या दिल्ली भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीला अण्णांनी खरमरीत पत्र पाठवून उत्तर दिले आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी नुकतेच एक पत्र पाठवून अण्णा हजारे यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यावर अण्णा हजारे यांनी गुप्ता यांना पत्र पाठवले आहे. देशात आपल्या (भाजपचे) पक्षाचे सहा वर्षांपासून सरकार आहे. आपल्या पक्षात सर्वाधिक युवक व सदस्य आहेत, असा आपल्या पक्षाचा दावा आहे. युवा शक्ती ही एक राष्ट्रशक्ती आहे. असे असतानाही आपण माझ्यासारख्या एका छोट्या खोलीत राहणाऱ्या 83 वर्षाच्या फकिर माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहात. ही सर्वात मोठी दुर्भाग्याची बाब आहे, अशा आशयाचे पत्र समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी गुप्ता यांना पाठवले आहे.
सर्व यंत्रणा केंद्राच्या हातात असताना एका फकिराला का मदत मागता?
हजारे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे, आपण मला 24 ऑगस्टला पाठविलेले पत्र माध्यमांद्वारे मला समजले. पत्रात आपण लिहिले आहे की, मी दिल्लीत येऊन आप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा. मात्र, मी एक फकिर माणूस आहे. माझ्याकडे सत्ता, पैसा असे काहीच नाही. देशात तुमच्या पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पाऊले उचलणार, असे म्हणातात. मग दिल्ली सरकारमध्ये जर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, तर केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार आहे. मग केंद्र सरकार दिल्ली सरकारच्या विरोधात कठोर करवाई का करत नाही?, असा प्रतिप्रश्न हजारे यांनी पत्रात उपस्थित केला आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार निर्मुलनाच्या केंद्र सरकारच्या सर्व घोषणा या फसव्या आहेत.
हेही वाचा - IPL : सीएसके टीममधील 12 सदस्यांना कोरोनाची लागण; संपूर्ण टीम क्वारंटाइन
मी 83 व्या वर्षी राष्ट्राच्या हितासाठी काम करत आहे. 22 वर्षे अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केली, 20 वेळा उपोषण केले. अनेक मंत्री व अधिकारी यांना आपल्या पदावरून घरी घालविले. मी कधीही पक्षाचा विचार केला नाही किंवा पक्षाच्या विरोधात आंदोलने केली नाहीत. मला कोणत्याही पक्षाशी काहीच देणे घेणे नाही. मी फक्त देश व समाजाच्या हिताचा विचार करत असतो. ज्या-ज्या वेळी मी आंदोलने केली, त्या-त्या वेळी सत्तेत असणाऱ्या पक्षाने माझा संबध विरोधी पक्षाशी सातत्याने जोडला आहे.
माझ्या 2011 सालच्या आंदोलनाप्रसंगी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार वाढला होता, म्हणून मी आंदोलन केले. त्यावेळी जनताही त्रासली होती. लोकांच्या लक्षात आले की हजारे आपल्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे जनता माझ्या आंदोलनात सामील झाली. 2014 ला आपला पक्ष सत्तेत आला, तो केवळ जनतेला भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून. आता मात्र भ्रष्टाचारात व जनतेच्या त्रासात काहीच फरक पडलेला नाही. सर्वांना दुसऱ्याच्या पक्षाचे दोष दिसतात. मात्र, स्वतःच्या पक्षातील दोषही पहावयास शिकले पाहिजे.
व्यवस्था बदलल्याशिवाय उज्वल भविष्य नाही
सध्याच्या स्थितीत कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देईल, असे मला वाटत नाही. कारण प्रत्येक पक्षाचे सत्ता व सत्तेतून पैसा, असे समीकरण आहे. त्यासाठी पक्ष बदलून चालणार नाही, तर व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे. मी दिल्लीत येऊन काहीच फरक पडणार नाही. त्यासाठी व्यवस्था बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शेवटी हजारे यांनी गुप्ता यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार असल्याची अफवा; हजारो भक्त अहमदपूरमध्ये दाखल