अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असणार्या शाळांच्या घंटा आजपासून वाजणार आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात कोरोनामुळे पुढील दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील शाळेच्या घंटा आज वाजल्याच नाहीत. आता पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणापासून दुरच राहावं लागणार आहे.
जिल्ह्यातील 61 गावं सील
राज्यातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. शाळांमध्ये कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकारेपणे पालन करण्याची तयारी करण्यात आली. त्यात मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतर, विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, एका आड एक विद्यार्थी बसवण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील चोवीस गावात आणि त्या नंतर राहाता 7 तालुक्यात येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या गावातील शाळाही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात 225 शाळा सुरू
संगमनेर आणि राहता येथील 61 गावं सील करण्यात आली आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील 61 गावांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांची घंटा वाजलीच नाही. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंत शाळांची संख्या 2 हजार 122 आहे. यातील सुमारे 200 शाळा सुरू होऊ शकणार नाहीत. तर दुसरीकडे जिल्ह्यात सध्या 225 आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - पुण्यात शाळा सुरू ! विद्यार्थ्यांचे औक्षण करत चॉकलेट देऊन स्वागत