अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठार भागातील केळवाडी येथील पाझर तलावाचे पाणी बोटा ग्रामपंचायतीच्या शिफारशीनुसार नागरिकांना आणि जनावरांना पीण्यासाठी पाटबंधारे विभागाने आरक्षित केलेले आहे. मात्र, यातही तलावाच्या खालचे व वरचे रहिवासी असे दोन गट असल्याने, पाण्यासाठीचा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मागील महिन्यात उपोषणाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बुधवार पासून सुमारे २८ महिला आणि पुरुष ग्रामस्थ संगमनेरच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस असून अद्याप प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
केळवाडी लघु पाटबंधारे विभागाच्या पाझर तलावाच्या दक्षिणेकडील रहिवाशांनी पिण्याचे पाणी आरक्षित असलेल्या या तलावापासून २०० मीटरच्या आतील शेतीसाठीची विहीर व धरणक्षेत्रातील बोअरवेलचा विजपुरवठा खंडीत करावा. या वीजपुरवठ्यासाठी तातडीने पाच खांब टाकून एक्सप्रेस लाईन चालु करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत. शासन निर्णयानुसार धरणाची भिंत व पायथ्यालगत बेकायदेशीर बांधकाम व खोदकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत तसेच तहसिलदार व पाटबंधारे उपविभागाचे सहायक कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या पहाणीनुसार आठवड्यातून आठ तास विजपुरवठा सुरु करावा. प्रशासनाची दिशाभुल करणारा अहवाल देणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व तत्सम अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. या मागण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी राजकीय कारणातून जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत, आजपासून मोहन लामखडे यांच्यासह २८ जण उपोषणाला बसले असून, डॉ. अरुण इथापे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.