अहमदनगर - राज्य सरकारने साई मंदिर खुले करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर, काय काय उपाय-योजना कराव्यात याचा अभ्यास सध्या साई संस्थानकडून केला जात आहे. कोविड काळानंतर मंदिर सुरू करणाऱ्या तिरुपती देवस्थानला साई संस्थानच्या शिष्टमंडळाने भेट देत बैठक घेतली. या बैठकीत देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साई संस्थानच्या वतीने देण्यात आला असून, तिरुपती देवस्थानने अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
राज्य सरकारने मंदिर उघडण्याचे आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साई मंदिर उघडता येईल त्यादृष्टीने साई संस्थान तयारी करत असून, तिरुपती देवस्थानमध्ये सध्या रोज १२ हजार भाविक दर्शन घेत आहेत. तेथील प्रसादालय सुरू आहेत. आरोग्य सेतू मार्फत कोरोनाबाधित भाविकांवर नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय केवळ ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेऊ देण्यात येत आहे. लहान मुले व वृद्धांना तुर्तास दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. ट्रायझोन मशीन बसवण्यात आले आहे. यातून बाहेर पडणारा ओझोन कोरोनाच्या जंतू संसर्गावर मात करण्यास प्रभवी आहे. या प्रकारची मशीनरी शिर्डीतही बसवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे बगाटे म्हणाले.
साई संस्थानच्या शिष्टमंडळाने तिरुपती देवस्थानचे आर्थिक, कर्मचारी व्यवस्थापन याचीही बारकाईने माहिती घेतली. तिरुपतीला भाविकांकडून येणारे सोने, इतर दान यांची पडताळणी पद्धती, तसेच आयकर व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या ट्रस्ट निर्मितीचा उपाय उत्तम असून, ही व्यवस्था साई संस्थानमध्ये लागू करण्याच्या दृष्टीने सखोल माहिती घेण्यात आली आहे. तसेच, तिरुपतीमध्ये भाविकांच्या वस्तूंची चोरी आणि लुटमार रोखण्यासाठी सीसीटीव्ही सर्व्हिलंस, फेस डिटेक्टक्षनद्वारे आरोपी शोधण्यात येतात. शिर्डीतही ही पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले.
कोविड काळानंतर मंदिर सुरू करणाऱ्या तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती घेण्यासाठी त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी साई संस्थानच्या वतीने शिर्डीला आमंत्रित केले गेले होते. त्यानंतर तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बारेड्डी यांनी शिर्डीला भेट देत संस्थानच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत कोविडवर नियंत्रण ठेवत दर्शनव्यवस्था कशी सुरळीत ठेवायची, याबाबत चर्चा केली होते. आणि साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी तिरुपती बालाजी देवस्थानची व्यवस्थाही पाहण्यासाठी यावे, असे निमंत्रण तिरुपती बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष, वाय.व्ही. सुब्बारेडी यांनी साई संस्थानला दिले होते. त्या अनुषंगाने साई संस्थानचे शिष्टमंडळ तिरुपती बालाजी देवस्थानला भेट देण्यासाठी गेले होते, अशी माहिती बगाटे यांनी दिली.
राज्य शासनाकडून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्याचे आदेश प्राप्त झाल्यास भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करून तात्काळ भाविकांना दर्शन व्यवस्था करता येईल. कोरोनाबाधित भक्त आढळल्यास त्यांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करून तिरुपती प्रमाणे उपाय-योजना शिर्डीत करण्यात येईल, अशी माहितीही बगाटे यांनी दिली.
हेही वाचा- स्थायीचे सभापती भाजपाचे की राष्ट्रवादीचे?, अहमदनगर महापालिकेत रंगले सर्वपक्षीय नाट्य