शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभराव्या भागाचे प्रक्षेपण पाहाण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या उस्थितीत करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांच्या या उपक्रमाचे शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. भाजपाचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, रघूनाथ बोठे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतीश बावके, बाळासाहेब जपे, बाबासाहेब डांगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.
जनतेशी संवाद साधणारे पंतप्रधान : आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात थेट जनतेशी संवाद साधणारे पंतप्रधान मोदी एकमेव नेते ठरले आहेत. सलग साडेआठ वर्षे हा उपक्रम सुरू ठेवून देशातील विविध उपक्रम जगासमोर आणले. हे मन की बात कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले असल्याचे विखे पाटील म्हणाले. देशात कोणालाही माहीत नव्हते असे उपक्रम पंतप्रधान मोदीनी या कार्यक्रमातून लोकांसमोर आणले. अनेक तरुणांनी सुरू केलेले स्टार्ट अप माहीतीच्या रुपाने लोकाभिमुख केले. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यावर त्यांनी या कार्यक्रमातून विशेष भर दिला. देशातील सांस्कृतिक परंपरा या कार्यक्रमातून समोर आणले. देशाच्या एकात्मतेची एक वेगळी ओळख जगात निर्माण करण्यात यश मिळवले असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमात युनेस्कोच्या प्रतिनीधीचा सहभाग : आजच्या शंभराव्या कार्यक्रमात युनेस्कोच्या प्रतिनीधीचा सहभाग, मन की बात कार्यक्रमाचे केलेले कौतुक या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले असल्याचे नमूद करुन, पाटील म्हणाले विश्वनेता म्हणून पंतप्रधान मोदी यांचा गौरव सर्वत्र होत आहे. जी २० परीषदेचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही आपल्या सर्वाच्या दृष्टीने भूषणावह घटना आहे. देश महासतेच्या दिशेने करीत असलेली वाटचाल ही त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निर्णयाचे यश असल्याचे विखे पाटील म्हणाले. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न आणता देशातील प्रत्येकजण मन की बात कार्यक्रमात सहभागी होतो. मोदीजींचा संवाद ऐकतो. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद ही मन की बातची ताकद असल्याचै त्यांनी शेवटी सांगितले.