अहमदनगर- जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी मोहा ग्रामस्थांनी २३ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांपैकी ९ जणांची प्रकृती खालावली असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फक्त आश्वासन नाही, तर कलाकेंद्र आधी बंद करा, त्यानंतरच उपोषण मागे घेतले जाईल, असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
मागील ५ ते ६ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने येणारे प्रस्ताव तहसीलदार विशाल नाईकवडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहेत. परंतु उपोषण थांबवण्यात आले नाही. मोहा हद्दीतील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी ६ दिवसांपासून मोहा गावातील २४ ग्रामस्थ उपोषणास बसले असून त्यापैकी ९ जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आकाश रेडे, भिमराव कापसे, अशोक रेडे, पंडित गायकवाड, मारूती बेलेकर, नितीन बांगर, नामदेव घुमरे, जालिंदर रेडे, कृष्णा रेडे या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांना दवाखान्यात हलविण्यात आल्याचे वृत्त समजताच मोहा ग्रामपंचायत हद्दीतील मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी, पांडववस्ती येथील महिला, पुरुष व युवकांनी उपोषणस्थळी गर्दी करून पाठिंबा दर्शवला.
दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार विशाल नाईकवडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी फौजफाट्यासह उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्यासाठी परावृत्त केले. परंतु, उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.कलाकेंद्र बंद करण्याच्या मागणीला शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत न जाता उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे मोहा हद्दीतील सर्व शाळा अघोषित बंद आहेत. मोहा ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासन त्यांना कधी न्याय देईल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.