अहमदनगर - स्वतंत्र्याच्या सत्तरीनंतरही अतीदुर्गम, ऊंच डोंगरावर असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पेमरेवाडी आजही विकासापासून कोसो दूर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न सुटल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज लोकसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे.
संगमनेर तालुक्यापासून ४५ कि.मी. असणाऱ्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून जवळपास ३०० ते ४०० लोकसंख्या या वाडीची आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाची पिकही वाया गेली आहेत. जिव धोक्यात घालून महिलांना गावात असलेल्या एका विहीरीचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे महिलांना विहीरीत ऊतरावे लागत असून झिरप्याच्या माध्यमातून महिला पाणी भरत आहेत. आणि पुन्हा डोक्यावर हांडे घेउन विहीरीतून वर यावे लागत आहे. विहीरीला कठाडे सुद्धा नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे.
गावात कोणतीच बस येत नसल्याने मुलींना शाळेला जाता येत नाही. तसेच आई वडील यामुळे आम्हांला शाळेला पाठवत नाहीत. अशी खंत मोहिनी पोखरकर यांनी व्यक्त केली आहे. परिसरात कुठेच काम नसल्याने ३० ते ४० महिला दररोज सकाळी पिकअप गाडीव्दारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, ओतूर या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जातात. कामाला जाताना या महिला आपल्या बरोबर ३५ लिटरचा पाण्याचा मोकळा ड्रमही घेवून जात असतात. कामावरून सुट्टी झाली की, या महिला ड्रम भरून घेवून येत असतात, अशी अवस्था सध्या पेमरेवाडीच्या महिलांची झाली आहे. वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाणी या मुलभुत गरजाच सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरूणांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, असा ठाम निर्णय या ग्रामस्थांसह तरूणांनी घेतला आहे.