अहमदनगर - विधानसभेची मतमोजणी 24 ऑक्टोबरला झाल्यानंतर तब्बल एक महिना आणि तीन दिवसानंतर महाविकास आघाडी सत्तेत येणार हे चित्र स्पष्ट होत आहे. या आघाडीत सहभागी होत असलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस हे पक्ष राज्यात नवे सत्ता समीकरण स्थापन करत असल्याचे संकेत हे मतमोजणीच्या दिवशीच शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ई टीव्ही भारत सोबत बोलताना त्याचवेळी दिले होते.
हेही वाचा - ...अशी असेल विश्वासदर्शक चाचणी!
24 ऑक्टोबरला कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास रोहित पवार यांनी मजबूत आघाडी घेतली होती तर नगर जिल्ह्यासह राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा एक्सिट पोल पेक्षा अधिकच्या संख्येने पुढे जात होती. अगदी त्याच वेळेस रोहित यांची ई-टीव्ही भारतने त्यांची प्राप्त परिस्थितीवर बातचीत करताना आघाडीच्या जागा वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी परिस्थितीचे विश्लेषण करताना दिवाळी दरम्यान राज्यात सत्तेची नवी समीकरणे पुढे येतील हे स्पष्टपणे ई-टीव्हीला सांगितले होते. रोहित पवार यांनी महिनाभरापूर्वी स्पष्ट केलेली सत्तासमीकरणाची अनुभूती आता समोर येत असून यात शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी येत्या काही तासात सत्तेत येणार असे चित्र आहे.