शिर्डी (अहमदनगर) - नगरच्या शासकीय धान्य गोदामातील नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील भिकाजी भाऊराव थोरात यांना गेल्या सहा वर्षापासून सेवानिवृत्तीचे वेतन मिळत नाही. सरकार व प्रशासनाच्या अनास्थेला वैतागून त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
भिकाजी भाऊराव थोरात कैफियत मांडताना अहमदनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथून थोरात हे मे 2014 ला सेवानिवृत्त झाले, त्यांनी सेवानिवृत्ती वेतन मिळावे, त्याबाबतचे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाला दिली. त्याचबरोबर ते गेल्या 6 वर्षांपासून आपल्याला सेवानिवृत्ती वेतन मिळावे म्हणून पाठपुरावा करत आहेत. सेवा निवृत्ती वेतनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेब्रुवारी 2018 मध्ये सेवानिवृत्ती देणेबाबत निकाल दिला आहे. 2018 ला उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून थोरात हे जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पाठपुरावा करत असून प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे थोरात यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदन कोरोना काळात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मला सध्या वयोमानाने कोणतेही काम होत नाही, सध्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रचंड मानसिक तणाव आहे. सेवानिवृत्ती वेतन देणेबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.