अहमदनगर - राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत-जामखेडच्या निकालाकडे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होते. राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू रोहित पवारांचा सामना गेल्या 10 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या भाजपच्या मंत्री राम शिंदेंशी होता. देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडमधील प्रचारसभेत रोहित पवार यांचा बारामतीचे पार्सल म्हणून उल्लेख केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचे हे विधान खोटे ठरवत पवार यांनी शिंदे यांचा 42 हजार इतक्या फरकाने दारुण पराभव केला.
मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून शिंदे आणि पवार अशी आघाडी पिछाडी अधुन-मधून चालू होती. मात्र, रोहित पवार यांनी मधल्या फेरीनंतर जी मुसंडी मारली ती शिंदे यांनी ओलांडता आली नाही. रोहित पवार यांच्या विजयानंतर कर्जत आणि जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.
कर्जत-जामखेड :
कर्जत-जामखेड या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे मंत्री राम शिंदेंचं वर्चस्व आहे. विरोधकांना फार काही जादू करता आलेली नाही. मात्र, यंदा त्यांची लढाई शरद पवारांचे नातू रोहित पवारांसोबत होती. ते राष्ट्रवादीकडून लढले. त्यामुळे संपूर्ण राज्यांचं लक्ष या लढतीकडे लागले होते. गेल्या पंचवार्षीकला या मतदारसंघात 66.04 टक्के मतदान झाले होते. तर यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा 73.98 टक्के मतदान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात आणि विखे विरुद्ध पवार असा कलगीतुरा पाहायला मिळाला. कर्जत-जामखेड या मतदारसंघातील रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे जरी असले तरी ही लढाई खर तर विखे विरुद्ध पवार अशीच होती..