अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या गुरुस्थान मंदिराजवळ २ दिवसांपूर्वी एका आईने आपल्या चिमुकलीला सोडून निघून गेली होती. दरम्यान, ती आई आपल्या मुलीच्या शोधात शनिवारी पुन्हा मंदिरात आली. परंतु, यावेळी तिने मुलीला आपल्या बरोबर घेऊन जाण्यास असमर्थता दर्शविली. यासंबंधी तिची विचारपूस केली असता वेगळीच ट्रॅजेडी समोर आली.
३१ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान साईमंदिर परीसरात एका चिमुकलीला सोडून जाणारी आई शनिवारी रात्री अचानक २ वाजेच्या सुमारास साई संस्थानच्या संरक्षण कार्यालयात आली. यावेळी ती माझी काजल (बदललेलं नाव) कुठे आहे? असे विचारु लागली. मुलीला सोडून जाणारी हीच ती महिला असल्याचे सुरक्षा रक्षकांच्याही लक्षात आले होते. त्यानंतर त्या महिलेने मीच त्या मुलीची आई शितल असून मीच तिला मंदिरात सोडून गेल्याचे सांगितले. दुसरीकडे मुलीला पोलिसांनी नगर येथील चाईल्ड लाईन संस्थेकडे सुपूर्द केले होते. मी माझ्या मुलीला फक्त पाहण्यासाठी आले आहे. परंतु, मी मुलीला घेवून जाणार नाही, असे त्या महिलेने सांगितले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी तिला धीर देत तीची चौकशी केली.
यावेळी महिलेने सांगितले, की माझे नाव कोमल (नाव बदलेलं, जिल्हा जळगाव) असून माझा पती सुरेश (नाव बदलेलं) हा एक गाडी चालक आहे. तो दररोज दारू पिऊन येतो. त्यामुळे मी त्याला सोडून मामाच्या घरी निघुन गेले होते. तेव्हा मामा माझे दूसरे लग्न करुन देण्याचा विचार करत होते. मात्र, मी तेथील एका व्यक्तीच्या प्रेमात पडले. त्यानेही माझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगत एक मुलगी होईपर्यंत माझ्याशी सबंध ठेवले. मात्र, नंतर काजलला त्याचे नाव लावण्यास नकार दिल्याने मी पुन्हा माझा पतीच्या घरी निघून आले. त्यावेळी पतीने या चिमुकल्या मुलीसोबत मला स्वीकारण्यास नकार दिल्याने मी तिला साई मंदिरात सोडून निघून गेले.
एका आईच्या मायेपोटी मी तिला पुन्हा बघायला आले. परंतु, मला माझा नवरा आणि एका मुली बरोबर राहायचे असल्याने या मुलीला मी सोबत नेऊ शकत नाही. काजलला कोणी तरी दत्तक घ्या किंवा एखाद्या अनाथालयात ठेवा, अशी मागणी या आईने केली आहे.