अहमदनगर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयात वैध ठरवण्यात आले आहे. या निर्णायाचे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जमलेल्या मराठा समाजाच्या महिला-पुरुषांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विविध पक्षाचे नेते, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकजण यावेळी उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. न्यायालयाच्या निकालाने आरक्षण लढ्याला यश आल्याबद्दल न्यायालयाचे यावेळी आभार मानण्यात आले.