शिर्डी - मराठी नववर्षाची सुरूवात आज ठिकठिकाणी गुढी-तोरणे उभारुन केली जाते. शिर्डीच्या साईबाबा मंदीरावरच्या कलशावर आज गुढी उभारण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचागाची विधीवत पूजा करण्यात आली. जगावर आणि देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी साई चरणी प्रार्थना करण्यात आली.
भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी
आज सकाळीच साडे सहा वाजता साईबाबा मंदीराच्या कळसा जवळ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांंनी सपत्नीक विधीवत पुजा केली. साई मंदीरातील सर्व धार्मिक पूजा विधी पंचागाप्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पूजा साई मंदीराचे मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी केली. गुढीपाडव्यानिमित्त साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार करण्यात आला आहे. मराठी नववर्षाच्या निम्मीताने महाराष्ट्रतून आणि देशातून मोठ्या प्रमाणात साई भक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याने भाविकांना विना यंदाचा गुढी पाडवा साजरा करण्यात येत आहे.
कडूनिंंबाच्या पानाला विशेष महत्व
गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंंबाच्या पानाला विशेष महत्व आहे. निंब हा कडू असला तरी तो आरोग्यास हितकारक असतो. साईबाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. भक्तांनी घरुनच दर्शन घेत कोरोनाचे सकंट दूर होवो अशी प्रार्थना केली आहे.