अहमदनगर Ganeshotsav २०२३ : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील पोहेगावसह पाच गावांच्या सीमेवर असलेलं मयुरेश्वराचं मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे तसेच मुंबई येथून देखील भाविक या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी गणेश चतुर्थीला या ठिकाणाला जत्रेचं स्वरुप प्राप्त होतं.
केवळ गणेश भक्तांच्या देणगीतून साकारलं मंदिर : मयुरेश्वराचं हे मंदिर भक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. कोपरगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर केवळ गणेश भक्तांच्या देणगीतून साकारलेलं हे मंदिर पौराणिक आणि आधुनिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. वर्गणी गोळा न करता गणेश भक्तांनी आपल्या इच्छेनुसार दिलेल्या दानातून हे गणपतीचं सुंदर मंदिर या ठिकाणी उभं राहिलयं.
या पाच गावांच्या सीमेवर आहे : मयुरेश्वराचं हे मंदिर पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे, झगडेफाटा देर्डे व नगदवाडी या पाच गावाच्या सीमेवर आहे. ते संगमनेर ते कोपरगाव या दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर असल्यानं परिसरातील नागरिक येथं मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिर परिसरात आता वृक्ष लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यानं वाटसरूही येथं विसाव्यासाठी थांबतात. मयुरेश्वर मंदिरात संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी जमते. मयुरेश्वर मंदिर ट्र्स्टच्या वतीनं भक्तांना प्रसाद वाटपासह इतर सामाजिक उपक्रमही नियमित पार पाडले जातात.
मंदिराची आख्यायिका : या मंदिराच्या स्थापनेबद्दल येथे एक आख्यायिका सांगितली जाते. पोहेगावच्या सीमेवर रोहमारे परिवाराची पिढीजात शेती आहे. एका दिवशी त्यांच्या शेतात शमीच्या झाडाखाली गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकटली. त्यानंतर तेथील बाळाजी रोहमारे यांना गणेशानं स्वप्नात येऊन, माझी प्रतिष्ठापना करा असा दृष्टांत दिला. त्यानंतर रोहमारे परिवारानं शमीच्या झाडाजवळचं गणेश मूर्तीची स्थापना करत मंदिर उभारलं. कालांतरानं या मंदिराचा जिर्णोद्धार होत आज या ठिकाणी भव्य असं गणेश मंदिर उभं राहिलं आहे. या शमीच्या झाडाखाली एक छोटी मूर्तीही स्थापन करण्यात आली आहे. भाविक प्रथम या मूर्तीचं दर्शन घेऊन नंतर गाभाऱ्यातील गणेश मूर्तीचं दर्शन घेतात.
हेही वाचा :