अहमदनगर - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी सुरू आहे, मात्र तरीही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आज सकाळी जिल्ह्यात पुन्हा ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये जामखेडमध्ये २ तर संगमनेरमध्ये ४ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.
पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवलेल्या स्त्राव नमुन्यातील सहा व्यक्तींचे स्त्राव हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार असे एकूण सहा व्यक्तींच्या कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आता एकूण ३७ रुग्ण झाले असून आतापर्यंत 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे.
जामखेड शहरातील रुग्णांची संख्या 11 पोहोचली आहे. त्यामुळे जामखेडमधील हॉटस्पॉट परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जामखेड शहरातील संचारबंदी 6 मे पर्यंत वाढवली आहे. जिल्ह्यातील मुकुंदनगर, संगमनेरमधील नाईकवाडापुरा हे भाग हॉटस्पॉट आहेत.