अहमदनगर - राज्यात 'आदर्शगाव' म्हणून ज्याचा नेहमीच आदराने उल्लेख होतो अशा हिवरे बाजारमध्ये आज तब्बल तीस वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हिवरेबाजार येथील मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला. ग्रामस्थ सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.
लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार -
निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे आणि यंदा तो स्वीकारावा लागला आहे. अगदी शांततेत प्रचार करत आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले. तीस वर्षानंतर बोटावर शाई लागली याचेही समाधान आहे. आतापर्यंत गावाच्या संमतीनेच बिनविरोध निवडणुका झाल्या. गावाचा विकास करताना आमच्यावर कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. यंदाही बिनविरोध निवडणूक व्हावी ही इच्छा होती मात्र लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. एका प्रवाहाला निवडणुका व्हाव्यात असे वाटले त्यात काही गैर नाही. आता निवडणुकांचा निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा विकासाच्या पुढच्या दिशेने संपूर्ण गाव एकोप्याने मार्गक्रमण करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
१९८५ नंतर होत आहे २०२१मध्ये निवडणूक -
हिवरेबाजारमध्ये यापूर्वी १९८५ साली ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यानंतर पोपटराव पवार यांच्या उमद्या कार्यकर्तृत्वावर गावाने विश्वास टाकला आणि त्यानंतरच्या सर्व ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या. यंदा मात्र. एका गटाच्या आग्रहाने निवडणूक होत आहेत, मात्र या लोकशाही प्रक्रियेचा आनंद गावकरी उत्साहात घेताना दिसून येत आहेत.