अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे कनोली फाट्यावर उसाच्या ट्रॅक्टरने एका महिलेला चिरडल्याची घटना घडली. यामध्ये सुनिता राजेंद्र गायकवाड (वय - ४७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
सुनिता गायकवाड आश्वी येथून संगमनेरच्या दिशेने चालल्या होत्या. यावेळी संगमनेरच्या दिशेने चाललेल्या उसाचा ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्येच सुनिता यांचा मृत्यू झाला. सुनिता गायकवाड या आश्वी खुर्दच्या रहिवासी असून त्या संगमनेर येथे वास्तव्यास होत्या. त्या शिबलापूर व पानोडी गावच्या कृषी साहाय्यक म्हणून सध्या काम करत होत्या. त्यांचे पती राजेंद्र बाळकृष्ण गायकवाड हेही आश्वी बुद्रुकचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी, सासु, सासरे, जावई असा मोठा परिवार आहे. सुनिता यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती कळताच आश्वी खुर्द गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
धोकादायक रस्त्यांचा २ महिन्यातला दुसरा बळी
संगमनेर-शिबलापूर या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे व कडेला कपारी असल्याने नियमित अपघात होत असतात. ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बेदरकार वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यावर अपघातात वाढ झाली असून मागील २ महिन्यांतील या रस्त्यावरील हा दुसरा बळी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्त सवाल आश्वी खुर्द ग्रामस्थांनी केला आहे.