पाथर्डी - तालुक्यातील भारजवाडी येथील सीआरपीएफ जवान कपिल पालवे हे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर कीर्तनवाडी येथे अपघातात ठार झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी झाला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारजवाडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाचे खरवंडी कासार येथून सायंकाळी साडेसात वाजता भारजवाडी येथे राहत्या घरी जात असताना अपघातात निधन झाले. यामुळे भगवानगड परिसरात शोककळा पसरली आहे. कपिल पालवे हे सीआरपीएफ जवान स्व. बाबासाहेब पालवे यांचे चिरंजीव होत. पालवे हे नुकतीच सुट्टी घेऊन घरी आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस त्यांनी कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवार सोबत साजरा केला होता.
कपिल पालवे यांचे मातृ-पितृ छत्र लहानपणीच हरपले असल्याने कुटुंबात दोन बहिणी व कपिल हेच होते. दोन्ही बहिणींची लग्ने झाल्याने कपिल व त्यांच्या पत्नी हेच परिवारात राहिले होते. एका वर्षांपूर्वी पालवे यांचे लग्न झाले होते. नवीन दाम्पत्यांचा संसार सुखी चालला होता. त्यातच मेजर कपिल पालवे यांच्यावर काळाने झडप घालत त्यांना हिरावून नेले.
देशाच्या सीमेवर शत्रूशी झुंज देण्याचे काम पालवे त्यांनी केले होते. निखळ देशभक्तीचा झरा मावळला असल्याने भगवान गड परिसरात शोककळा पसरली आहे. कपिल पालवे यांच्या पश्चात फक्त त्यांची पत्नी व दोन बहिणी आहेत. अफाट मित्रपरिवार असलेले मेजर कपिल पालवे यांच्या निधनाने भगवानगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.