अहमदनगर - शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेवगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावणेदोन तास बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे रोड वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी पिकं वाहून गेली आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील छोटेमोठे बंधारे भरून वाहत आहेत.
मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या तालुक्याला पावसाने दिसाला दिला होता. त्यामुळे कापूस ,बाजरी, मूग, तूर,भुईमूग यांसारखी पिकं चांगली बहरली होती. मात्र अतिवृष्टीमुळे आता हातातोंडाशी आलेली पिकं स़डून जाण्याच्या मार्गावर आहेत.
सतत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भातकुडगाव, ढोरजळगाव या मंडळामध्ये अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीक विमा भरण्यासाठी वाढीव मुदत मिळावी अशीही मागणी यावेळी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे,
पंचनामे करण्याची स्वाभिमानीची मागणी
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस, तूर, बाजरी या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खराब झालेल्या पिकांचे तहसील कार्यालयाने तत्काळ पंचनामे करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ते करत आहेत.