अहमदनगर - 'पिचड पितापुत्रांना भाजपची वाट दाखवणाऱ्यांनीच त्यांची वाट लावली आहे', असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखेंचे नाव न घेता लगावला आहे. तसेच योग्य वाट दाखवली असती, तर पिचडांचा पराभव झाला नसता, असेही ते म्हणाले.
अकोले विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.किरण लहामटे यांचा संगमनेर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विरोधकांवर निशाणा साधला.
माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंनी आम्हाला भाजपची वाट दाखवल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना, जिल्ह्यातील अनेक नेत्यांना काहींनी भाजपची वाट दाखवली, मात्र त्यांनी या नेत्यांची वाट लावली, असा टोला थोरात यांनी लगावला.
भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यावर पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना, अकोले मतदारसंघातील लोकांना यंदा पिचड नकोच होते. त्यातच नियतीने पक्ष बदलाचा खेळ खेळला अन पिचडांना जनतेने घरी बसवल्याचे ते म्हणाले. आजवर ज्यांनी पवार साहेबांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने घरी बसवले, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मधुकर पिचड यांना लगावला.