अहमदनगर - राहाता तालुक्यातील दाढ या गावातील एका मुलाने इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. वैभव गाडेकर असे या मुलाचे नाव असून तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने वैभव दररोज आठ किलोमीटर अंतर सायकलवर कापून लोणी येथे शिक्षणासाठी जात होता. यामुळेच त्याला इलेक्ट्रिक सायकल करण्याची कल्पना सुचली. वैभवने आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करुन सायकल तयार केली. त्याने साध्या सायकलमध्ये बदल करुन चार्ज केलेल्या बॅटरीवर एकावेळी तीस किलोमीटर चालेल, अशी सायकल बनवली आहे. बॅटरी संपल्यानंतर ही सायकल पायडल मारूनही चालवता यावी, यासाठी त्याने एक किट विकसित केले आहे. सायकल किती वेगाने चालली आहे, किती किलो मीटर चालली, बॅटरी किती चार्ज आहे, याची माहिती देणारी यंत्रणाही या सायकलला बसवली आहे.
हेही वाचा - इंटरनेट वापराबाबत काश्मीरचे घटनात्मक अधिकार!
वैभवने तयार केलेल्या सायकलला अठरा हजार रुपये खर्च आला. वैभवच्या या खटाटोपाचा खर्च परवडणारा नसल्याने घरच्यांनी त्याला सुरुवातीला विरोध केला. मात्र, तरीही वैभवने जिद्द न सोडता आपल्या साठवलेल्या पैशातून सायकलमध्ये बदल करण्याचे काम केले. त्याच्या चुलत्यांनी त्याला काही पैसे देऊन प्रोत्साहन दिले.
कशी आहे सायकल -
स्पोर्ट सायकलला दोन बॅटरी असलेली गियरची मोटर बसवण्यात आली आहे. या मोटरला व्होल्ट मीटर बसवले आहे. त्यामुळे ही सायकल 120 किलोचे वजन पेलू शकते. या सायकलमध्ये ड्युएल मेकॅनिझम कार्यरत आहे. बॅटरी संपल्यास सायकल न थांबता पायडल मारुन चालवता येते. या सायकलमुळे कुठलेही प्रदूषण होत नाही.