अहमदनगर - अन्नातून झालेल्या विषबाधेने दोन सख्या बहीण- भावंडांचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे घडली आहे. अरहान (वय ५ वर्षे ) व मुलगी आयेशा (वय ४ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहे. बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर धक्का बसल्याने त्यांच्या मामाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले.
पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीच्या कडेला असणाऱ्या मुलानी गल्लीत वसिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. ते आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. वसिम यांची सासुरवाडी हणमतगांव (कोंबडवाडी) हाकेच्या अंतरावर आहे. वसिम यांची दोन्ही मुले अरहान व आयेशा यांचे नेहमी मामा शाविद आजिज शेख यांचे घरी जाणे-येणे होते.
नेहमीप्रमाणे अरहान व आयेशा हे मामा शाविद यांच्या घरी गेले होते. शाविद, त्यांचे कुटुंबीय व भाचा-भाची यांना दोन दिवसांपासून तब्येतीमध्ये थोडी अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी सोनगाव सात्रळ येथील खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली होती. परंतु, ऐन दसऱ्याच्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अरहान व आयेशा, मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत गेली. नातेवाईकांनी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
भाच्याच्या मृत्यूनंतर मामाला मानसिक धक्का-
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलगा अरहान याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन भाच्यांच्या मृत्यूची माहिती शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांना रुग्णालयातच पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तर शबाना यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन्ही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज-
मृत झालेल्या अरहान व आयेशा यांच्या मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर पाथरे बु.येथे सायंकाळी दफनविधी करण्यात आला. दोन्ही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूची खरी माहिती समोर येईल. या घटनेची लोणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक संतोष लांडे हे करत आहेत.
वसिम शेख हे हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. त्यांना असणारी दोनही अपत्ये मृत पावल्याने शेख कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.