अहमदनगर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ग्रामरक्षक समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करून कोरोनामुक्त गाव अभियान राबवा असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तालुका व शहरातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, आदी यावेळी उपस्थित होते.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. मात्र आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करावयाचा आहे. यासाठी प्रत्येक गावातील ग्राम रक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने त्याचे विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोनामुक्तीचा मार्ग आहे. मात्र यामध्ये सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निष्काळजीपणा कोरोनाला निमंत्रण देत आहे. म्हणून प्रत्येकाने शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे. विना मास्क कोणीही फिर नका, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. काही रुगणांमध्ये आढळून आलेल्या म्यूकरमायकोसिस या रोगाचा धोका मोठा असून या पासून स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करण्याकरता प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, कोरोना स्ट्रेंन दिवसेंदिवस बदलत आहे. नवा आजार हा अत्यंत घातक आहे. मात्र डबल मास्कचा वापर केल्याने आपण कोरोणापासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. प्रत्येकाने काळजी घेणे हेच कोरोना बचावाचा मोठे उपाय आहे. महाविकास आघाडी शासन व प्रशासन अत्यंत चांगले काम करत आहे. यायासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शंशिकांत मंगरुळे यांनी तालुक्यातील विविध गावांच्या कोरोना रुग्णांची व त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. मंत्री श्री.थोरात यांनी गटनिहाय गावांचा आढावा घेऊन पदाधिकारी व प्रशासनाला कोरोना रुग्ण वाढ रोखण्याच्या सूचना दिल्या.