शिर्डी ( अहमदनगर ) : बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने जाणता राजा मैदानावर शिंदेशाही बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की 26 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले. त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर तालुक्यातील जनतेपासून दूर रहावे लागले असा जीवनात कोणताच कालखंड नव्हता. संगमनेर तालुका हे आपले कुटुंब असून दर चार-आठ दिवसातून तालुक्यातील जनतेमध्ये येत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. शिवाय विकास कामांमध्ये सहभाग तसेच संस्थांच्या बैठका घेतो. कुटुंबाप्रमाणे काळजी घेत असून आतापर्यंत ही वाटचाल यशस्वी झाली आहे.
सर्वात चांगला तालुका : विकासाच्या वाटचालीमध्ये संगमनेर तालूका हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला तालूका म्हणून ओळखला जातो. येथील सुसंस्कृत राजकारण, शांतता सुव्यवस्था, प्रगती यामुळे राज्यातील वरच्या क्रमांकावर असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होत असतो. मधल्या काळामध्ये खूप राजकारण झाले. सत्ता बद्दल झाल्यानंतर तालुक्यावर सूड उगवावा असे हल्ले होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांचे उद्योगधंदे बंद पाडले जात असून अनेकांना अडचणीत आणले जात आहे. तालुक्यातील विकास कामे बंद पाडली जात आहेत. सत्ता बदलानंतर सुरू झालेले हे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. परंतू संघर्ष हा संगमनेर तालुक्याने कायम केलेले आहे. आपण संघर्षातूनच मोठे झालेले आहोत. निळवंडे धरणासाठीचा संघर्ष, पाणी वाटपाबाबतचा संघर्ष अशा विविध संघर्षांमधून तालुक्याची वाटचाल झाली आहे. या संघर्षातूनही आपण नक्कीच पुढे जाऊ. असे ते म्हणाले आहेत.
ते राजकारण व्यथित करणारे : मागील महिन्यात झालेले राजकारण हे व्यथित करणारे आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोलने योग्य नाही या मताचा मी आहे. पक्ष आणि माझ्या पातळीवर आपण योग्य निर्णय करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. काहींनी भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले एवढेच नाही तर भाजपाचे तिकीट वाटप सुद्धा केले. काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. असे असले तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत याच विचारांवर वाटचाल सुरू होती. यापुढेही काँग्रेसच्या विचारांवर वाटचाल सुरू राहणार असल्याची ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली असून यापुढील काळातही जनतेने आपल्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्याने विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले युवा आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे.