अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील हे पुत्र सुजयसाठी गाठीभेटी घेत असल्याचे वृत्त आम्ही माध्यमात ऐकत-वाचत आहोत. वरिष्ठांना याची कल्पना असतेच. मात्र काँग्रेस पक्ष हा संयमी आणि सहिष्णुतावादी आहे पण वेळ आल्यावर निर्णय घेईल, असे सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केले.
आम्ही काँग्रेसच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांना आजच्या मेळाव्याबाबत कळवले होते. पण ते (विखे) राज्यस्तरीय नेते आहेत. आम्हाला हेच पाहायचे होते की मेळाव्यास कोण येतो आणि कोण येत नाही, असे सांगत थोरतांनी विखेंवर निशाणा साधला.
या मेळाव्यास अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधल्या थोरात गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे यांनी नगर दक्षिणेत आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले असले, तरी थोरात गटाने या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी लक्ष घातल्याचे दिसून आले.
मेळाव्यात थोरात यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना कोणत्याही परिस्थितीत आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसा असे आवाहन केले.
शिर्डीत काँग्रेसचा मजबूत उमेदवार
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे हे सक्षम उमेदवार आहेत. इतरही काही नावे होती मात्र सलग दोनवेळा आमदार राहिलेले कांबळे हे योग्य उमेदवार वाटल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
जिल्ह्यात पक्षाला उभारी
आजचा मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्याचा आनंद थोरात यांच्या चेहऱ्यावर पण दिसून येत होता. याबाबत त्यांना छेडले असता, योग्य वेळ आली की उत्साह येतो. काँग्रेस पक्षाची अशीच ओळख असून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.