शिर्डी - कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका गावचे सुपुत्र सुनील रावसाहेब वलटे (वय ३८) यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आले. सुनील हे सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कारवाईवेळी २२ तारखेला त्यांना वीरमरण आले.
सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब हे शेती करतात. तर आई गृहिणी आहे. सुनील यांचे शालेय शिक्षण दहिगाव बोलका येथील वीरभद्र विद्यालय व बारावीपर्यंत तर शिक्षण एस.एस.जी.एम महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांनी कोपरगाव येथील सैनिक भरती केंद्रातील कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले. पुढे ते भारतीय लष्करात सैनिक म्हणून भरती झाले.
लष्करात भरती झाल्यावर त्यांची २४ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नायब सुभेदार पदावर त्यांची पदोन्नती झाली होती. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात त्यांना गोळी लागली होती. त्यातच त्यांना वीरमरण आले. त्यांचे मागे पत्नी मंगल, एक मुलगा (वय १४), एक मुलगी (वय ६), वडील, आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.