अहमदनगर- दिल्लीतील निर्भया अत्याचार व खून प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा न्यायालयाने 22 जानेवारीला फाशी देण्याचा निर्णय दिला आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्यानतंरच आपण मौन आंदोलन सोडणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..
निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याने जनतेचा, महिलांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल,असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच देशाचे संविधान सर्वोच्च असल्याचेही ते म्हणाले. आपला देश कायद्याच्या आधारे चालतो. निर्भया प्रकरणात न्यायालयाने 2013 मध्येच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु सात वर्षांत त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. पतियाळा न्यायालयाने आज आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची तारीख व वेळ जाहीर करून जनतेच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला आहे.
न्याय व्यवस्थेत 'देर है लेकिन अंधेर नही' असे हजारे यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर आपण मौन आंदोलन सोडणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, आताच मौन थांबविणार नाही, तर शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत आपले मौनव्रत सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अण्णांच्या मौनव्रत आंदोलनाचा मंगळवारी 19वा दिवस होता.