शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यातील वाळकी गावात अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे जनावरे दगावत असल्याचे समोर आले आहे. स्लोपॉयझनींगमुळे गाईंचा मृत्यू होत आहे. मात्र, हे विष गाईच्या पोटात खाद्यातून जात असल्याचे समोर आले आहे. ही विषबाधा गाईंना नेमकी कशातून होते याचा शोध अद्याप लागलेला नसून दुसरीकडे मात्र रोज गाईंचा मृत्यू होत असल्याने गाई पालक शेतकरी हैराण झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून राहाता तालुक्यातील वाळकी गावातील गाई आजारी पडत असून चोवीस तासात त्या गाईंचा मृत्यू होत असल्याच समोर आले आहे. दुभती जनावरांचा मृत्यू होत असल्याने आणि पशू संवर्धन विभाग त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही शोधू शकले नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
राहाता तालुक्यातील वाळकी आणि परीसरात आतापर्यंत तेरापेक्षा जास्त गाई दगावल्या आहेत. राहात्याच्या पशुसंवर्धन विभागाला गाई आजारी पडल्याची माहीती मिळाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. मात्र, गाईंचा मृत्यू सुरूच आहे. शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालात गाईच्या पोटात ऑक्झीरेट असल्याने त्यांच्या शरीरातील कॅल्शिअम बाहेर फेकले जाते. त्यामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. गाई खात असलेल्या चाऱ्याचाही अहवाल हा निगेटिव्ह आल्याने नेमका गाईंना विषबाधा कशातून होत आहे. याचे कारण अद्याप समोर आले नाही.
गावा जवळील पाझर तलावाच्या आसपास मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यातील बराच कचरा हा पाण्यातही मिसळला गेला आहे. यामुळे पाणी खराब झाले असून हेच पाणी पाझरुन गावातील अनेक विहीरीत उतरले असल्याने हे पाणी पिल्याने गाईंना विषबाधा होत आहे का, याचा तपास तातडीने करण्याची गरज असून शासनाने गावात एक उच्चस्तरीयत पथक पाठवून जनावरे वाचविण्याची विनवणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख, नागापूर उपनगरात तीन कंटेन्मेंट झोन
हेही वाचा - थोरात कारखान्याची वाटचाल गैरवास्पद - बाळासाहेब थोरात