अहमदनगर Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय 58) यानं रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेड काढत बेदम मारहाण केली. या घटनेमुळं संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्यला मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोले पोलीस त्याला उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणानंतर अकोले तालुक्यात एकच खळबळ उडालीय.
कोण होता अण्णा वैद्य : काही वर्षांपूर्वी विद्युत मोटार केबल प्रकरणात गावकऱ्यांनी अण्णा वैद्य याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर त्याच्या शेतात घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये चार महिलांचे सांगाडे सापडल्यानं साखळी खून प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. दुसऱ्या एका खून प्रकरणात न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली होती. तर तिसऱ्या खून प्रकरणात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच अन्य एक खून खटला न्यायालयात प्रलंबित आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर वैद्य आपल्या गावी सुगाव खुर्द येथे राहत होता.
जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यू : दरम्यान, रविवारी सायंकाळी त्यानं एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. इतकंच नाही तर अण्णा वैद्यनं त्या मुलीला मारहाणही केली. हे बघून संतप्त जमावानं वैद्यला बेदम मारहाण केली. जमावाच्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या वैद्य याला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आलं होतं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
उपचार सुरू असताना आरोपीचा रविवारी रात्री 9 वाजता मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून आज होणार्या शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात येणार आहे- अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे
हेही वाचा -
- Four Prisoners Escaped From Prison : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार
- Husband Murder Case : पत्नीनेच केला पतीचा खून अन् रचला दरोड्याचा बनाव; पोलिसांनी उलगडले धक्कादायक गुपित
- Attack on Tahsildar : रस्त्याचा वाद सोडवायला गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला; महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटनेनं खळबळ