अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वास्तव्य केलेल्या 29 तबलिगींना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना देश सोडून जाता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले 29 परदेशी नागरिक नगर जिल्ह्यात आले होते.
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही या नागरिकांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर परदेशी नागरिकांसह त्यांना आश्रय देणाऱ्या विरोधात भिंगार कॅम्प, नेवासा व जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही परदेशी नागरिक कोरोनाबाधित झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते, तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवले होते. या सर्व नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस कोठडीनंतर परदेशी तबलिगी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या नागरिकांच्या वतीने अॅड. राजेंद्र सेलोत यांच्यामार्फत अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात तर, नेवासा न्यायालयात अॅड. पठाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.
न्यायालयाने घातलेल्या अटी आणि शर्ती
- परदेशी नागरिकांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये.
- कोरोनासंदर्भात शासनाने दिलेल्या उपाययोजनांचे पालन करावे.
- तपास कामासंदर्भात सहकार्य करणे
- ज्या ठिकाणी राहणार आहेत तेथील पत्ता प्रशासनाला कळवणे.
- मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे.
यासह इतर अटी व शर्तींवर न्यायालयाने या परदेशी नागरिकांना जामीन मंजूर केला आहे.