अहमदनगर - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या वक्तव्याच्या विरोधात शनिवारी शहर शिवसेनेने नेता सुभाष चौकात वारिस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केले.
हेही वाचा - 'माझे वक्तव्य हिंदू विरोधी नाही; हे राजकीय षडयंत्र'
शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वारिस यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी केली. वारिस यांना पाकिस्तानात पाठवा, या आशयाच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. 'जी गोष्ट मागून मिळत नाही, ती गोष्ट आपल्याला हिसकावून घ्यावी लागणार आहे. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा!' असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी केले होते. पठाण यांच्या या वक्तव्यानंतर आता चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.